- आठवडाभरात बेळगाव तालुक्यातील डेंग्यूचा दुसरा बळी
बेळगाव : काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या तापाने त्रस्त असलेल्या युवकाचा तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. प्रसाद मुचंडीकर (वय २८ रा.लक्ष्मी गल्ली, हिंडलगा) असे मृत तरुणाचे आहे. प्रचंड तापामुळे त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आजी, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
प्रसाद हा वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता. गेल्या चार दिवसापासून अस्वस्थपणा जाणवत असल्याने त्याने आपल्या कौटुंबिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. यातूनही प्रकृतीत सुधारणा नसल्याने केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने शुक्रवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. केवळ एक वर्षांपूर्वी विवाह झालेल्या प्रसादचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मागील पाच दिवसांपूर्वी बेळगाव तालुक्याच्या गोजगा गावातील एका युवकाचा डेंग्यूने बळी घेतला होता. त्यानंतर एका आठवड्यात बेळगाव मधील हा डेंग्यूचा दुसरा बळी आहे.
बेळगाव शहर परिसरात सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून ताप आला की लागलीच डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि तपासणी करून घेण्याची गरज आहे. अशावेळी आजारी रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने देखील ताप आलेल्या रुग्णांना तात्काळ उपचार करून काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. प्रशासनाने ही याकडे जातीने लक्ष घालून ज्या भागात स्वच्छता नाही अशा ठिकाणी स्वच्छता करून फवारणी करणे तितकेच गरजेचे आहे.
0 Comments