• ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

राजस्थानमधील झुंझुनू येथे एका दलित तरुणाला दारू माफियांकडून बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. देशात दलितांवरील अत्याचार वाढत असून याप्रकरणी सरकारने गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना कठोर कायदेशीर शिक्षा करावी, अशी मागणी दलित संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे.

झुंझुनू येथील सूरजगड पोलीस स्टेशन हद्दीतील बालोदा गावात १४ मे रोजी गावातील तरुण रामेश्वर वाल्मिकी या तरुणाचे दारू माफियांकडून अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून देशात दलितांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे असे लक्षात येत आहे. याप्रकरणी सरकारने गांभीर्याने लक्ष पुरवावे असे आवाहन ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राजस्थानच्या प्रशासनाला सदर निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना संघटनेचे काशिनाथ चव्हाण म्हणाले, दलितांवरील अन्याय, अत्याचाराप्रकरणी सरकार नुकसान भरपाई देते. मात्र समाजातील ही  मानसिकता बदलणे गरजेचे आहे. नुकसान भरपाईने कोणताही तोडगा निघणार नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने आरोपींना कायदेशीर कठोर कारवाईची तरतूद करणे गरजेचे आहे. यावेळी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राजेश बेनीवाल, मदन डोंगरे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.