• २.०५ लाखांचे ८ पंपसेट जप्त 
  • कुडची पोलिसांची कारवाई 

कुडची / वार्ताहर 

रायबाग तालुक्यातील कुडची पोलिस स्थानकाच्या हद्दीत शेतातील चोरीस गेलेल्या ८ मोटारींसह आरोपींना अटक करण्यात कुडची पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून २.०५ लाख रु. किंमतीचे ८ चालू पंपसेट व चोरीसाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या पंपसेट चोरीच्या तक्रारीचा तपास करणाऱ्या कुडची पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील रेल्वे फाटकजवळ संशयास्पदरित्या आढळलेल्या दोघा आरोपींना मोटारसायकल व विद्युत पंपसेटसह अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. कुडची, चिंचाळी व मोरब गावात शेतकऱ्यांचे पंपसेट चोरून विकल्याची कबुली त्यांनी दिली आहे. 

अथणीचे पोलिस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, पोलिस निरीक्षक रविचंद्र नायकोडी, पोलिस उपनिरीक्षक कलमेश बन्नुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मल्लाप्पा पुजारी,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक के.आर.साळुंके, एच.एस.गुडेद, सिद्धगौडा पाटील, अरीप मुनल, ए.एस.पाटील आणि बेळगाव तांत्रिक सेलचे विनोद ठक्कनवर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.  चोरीचा यशस्वी तपास केलेल्या पथकाचे बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रामगोंडा बसरगी यांनी कौतुक केले आहे.