• बेळगावचा ६४.९३ टक्के तर चिक्कोडीचा ६९.८२ टक्के निकाल 

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक एसएसएलसी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. ९ मे २०२४ रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. एसएसएलसी परीक्षेत यंदा बेळगाव  शैक्षणिक जिल्ह्याने ६४.९३ टक्के निकालासह २९ वा तर ६९.८२ टक्के निकालासह चिक्कोडीने २५ वा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी बेळगाव व चिक्कोडीच्या निकालाची टक्केवारी घटली असून गतवर्षी तेराव्या स्थानावर असलेल्या बेळगावची तीन तर चिक्कोडीची १२ स्थानांनी घसरण झाली आहे. यंदा एसएसएलसी परीक्षेत ६३१२०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यभरातून ७६.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी एसएसएलसी परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. 

  • बागलकोट येथील  मेलिगेरी मोरारजी निवासी शाळेतील अंकिता बसप्पा राज्यात प्रथम : 

कु.अंकिता बसप्पा

बागलकोट येथील मेलिगेरी मोरारजी निवासी शाळेतील अंकिता बसप्पा या विद्यार्थिनीने ६२५ पैकी ६२५  गुण मिळवत कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बेंगळुरू येथील मेधा पी शेट्टी या विद्यार्थिनीने ६२४ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ सात विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

  • अथणी तालुक्यातील सुबलसागर हायस्कूलचा सिद्धांत नाईकबा राज्यात द्वितीय : 

कु. सिद्धांत नाईकबा

बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील शेडबाळ येथील आचार्य सुबलसागर प्रौढ विद्यामंदिर शाळेच्या सिद्धांत नाईकबा या विद्यार्थ्यानेही उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ६२४ गुण मिळवून त्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, सिद्धांत नाईकबा याला  इंग्रजी वगळता सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

  • एसएसएलसी निकाल २०२४ : जिल्हानिहाय आकडेवारी 

एसएसएलसी परीक्षेच्या निकालात उडुपी जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यादगिरी शेवटच्या स्थानावर आहे. उडुपी जिल्ह्यात सार्वधिक ९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यादगिरी जिल्ह्यात सर्वात कमी ५०.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाच्या टक्केवारीत दक्षिण कन्नड जिल्हा ९२.१२ टक्के निकालासह द्वितीय तर शिमोगा आणि कोडगू हे दोन्ही  जिल्हे ८८.६७ टक्के निकालासह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कलबुर्गी आणि बिदरसारख्या अनेक जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी निकाल लागला आहे.