• घरोघरी रक्कम वाटप करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात यश 
  • पोलिसांनी रोख रक्कमेसह घेतले ताब्यात  

गोकाक : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या काही समर्थकांनी गोकाक लोकसभा मतदार संघांतर्गत केंद्रातील एका घराला प्रत्येकी हजार याप्रमाणे हजारोंची रक्कम वाटून धाक दाखवत मते खरेदी करण्याचा प्रयत्न चालविला होता. अखेर मतांची खरेदी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांकडे सोपविण्यात आले. यामध्ये गोकाक येथील पराभूत उमेदवार डॉ. महांतेश कडाडी, भद्रावती येथील दोन युवक आणि हर्षा शुगर्स कारखान्यात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अंकलगी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघातील अंकलगी गावात ही घटना उघडकीस आली. येथे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांकडून घरोघरी एक हजार रुपये वाटप केले जात होते. 

ही बातमी कळताचं भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. यावेळी संबंधितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र भाजप कार्यकर्त्यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना पकडले आणि मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या वीस लाखांच्या रक्कमेसह पोलिसांच्या ताब्यात दिले.  

दरम्यान अटक केलेल्या संबंधितांची पोलिसांनी चौकशी केली असता, त्यापैकी दोघांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल यांच्यासाठी पैसे वाटप करण्यासाठी आल्याचे सांगितले.

 या घटनेची नोंद अंकलगी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.