हुबळी / वार्ताहर 

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील बॅरिकेड्सला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हुबळी - गदग मार्गावरील आर्य पुलानजीक ॲनिगेरीजवळ मंगळवार दि. २८ मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. संदीप रेड्डी (वय २६, रा. मूळचा तेलंगणा) असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो नौदलात कार्यरत होता, असे सांगण्यात येत आहे. महिनाभराच्या सुट्टीनंतर कारवारला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ॲनिगेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद ॲनिगेरी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.