• जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारे बेकायदा शुक्ल (डोनेशन) आकारता येणार नाही. अशा शाळांनी नियमबाह्यपणे डोनेशन घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.

सध्या २०२४-२५ या  नूतन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शाळांमध्ये डोनेशन घेतले जात असल्याच्या तक्रारी जनतेतून आल्या आहेत. नियमानुसार शासनाने निश्चित केलेल्या शुल्कावरच प्रवेश देण्यात यावा. बेकायदेशीररीत्या डोनेशन घेतल्यास आर.टी.ई. कायद्यानुसार अशा शाळांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

  • प्रवेश शुल्क - माहिती प्रदर्शित करण्यासाठी सूचना:

पालक व जनतेच्या माहितीसाठी प्रत्येक शाळेने आपल्या सूचना फलकावर प्रवेश शुल्काची स्पष्ट माहिती लावावी,अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. शिक्षण हक्क कायदा -२००९  च्या कलम- २(ब) नुसार सर्व खाजगी शाळांनी अधिसूचित शुल्क त्यांच्या शाळेच्या संकेतस्थळावर, शाळेच्या सूचना फलकावर आणि विभागीय इंटरनेट (SATS) वर पालक आणि जनतेसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे पालक व सर्वसामान्यांना प्रवेश शुल्काबाबत माहिती मिळण्यास मदत होणार असून प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम दूर होणार आहे असे ते  म्हणाले.

  • सार्वजनिक तक्रारींची संधी:

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेने डोनेशन मागितल्यास जनता तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शालेय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे (डीडीपीआय) तक्रार करू शकते. लोकांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.