- निवडणुकीत अरभावीतून ८० हजारांचे मताधिक्क्य मिळेल : जगदीश शेट्टर
बेळगाव / प्रतिनिधी
भालचंद्र जारकीहोळी यांनी प्रचार न करता ७० हजारांची आघाडी घेऊन विधानसभा निवडणूक जिंकली. पण मी प्रचारासाठी आलो आहे, त्यामुळे मला तुमच्या मतदारसंघातून ८० हजारांचे मताधिक्क्य देण्यात यावे ,” असे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले.
- काही वर्षात भारत महासत्ता होईल :
लोकसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून मुदलगी मतदारसंघातील कौजलगी गावात प्रचारसभेत ते म्हणाले, काही वर्षांत चीन आणि अमेरिका यांना मागे टाकून भारत महासत्ता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जवानाचा सन्मान करण्याचे काम केले आहे. आमचे सैनिक चोवीस तास काम करतात. पाकिस्तानी सैनिकांनी आमच्यावर गोळीबार केल्यास त्यांच्यावर हल्ला करण्यास दिल्लीची परवानगी घ्यावी लागत होती. पण आता मोदींच्या राजवटीत चित्र पूर्णपणे बदलले आहे. पाकिस्तानने आमच्यावर एक गोळी झाडली तर १० गोळ्या झाडून प्रत्युत्तर देण्याची परवानगी मोदींनी दिली आहे, असे ते म्हणाले.
- काँग्रेस हमीभावाशिवाय अन्य कशावरही बोलत नाही :
आपले आरोग्य, देशाचे भवितव्य नरेंद्र मोदींच्या हातात आहे. हमीभावाशिवाय अन्य कशावरही काँग्रेस बोलणार नाही. निवडणुकीनंतर काँग्रेसची हमी बंद होईल, असे त्यांनी सांगितले. मला ३० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. बेळगावशी माझे विशेष नाते आहे. मी यापूर्वी बेळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे मतदान यंत्रावरील दुसऱ्या क्रमांकावरील बटण दाबून मला अर्थात भाजपला मतदान करून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मंडळ अध्यक्ष महादेवप्पा शकी, युवा नेते सर्वोत्तम जारकीहोळी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments