हुक्केरी वार्ताहर 

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलिसांनी गोव्यातून आंध्रप्रदेशकडे अवैधरित्या नेण्यात येणारा गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला. याप्रकरणी कंटेनर चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हापोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव शिरहट्टी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

विविध प्रकारच्या महागड्या दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती यमकनमर्डी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल शनिवारी रात्री उशिरा गोव्याहून आंध्रप्रदेशकडे निघालेल्या कंटेनर क्रमांक एमएच - ४६ एएफ- ४१३८ ची तपासणी केली असता,  त्यामध्ये  २८ लाख रुपये किमतीच्या  १६ हजार ८४८ लिटर गोवा बनावटीच्या अवैध दारूचे १९५० बॉक्स आढळून आले. यानंतर पोलिसांनी दारूसाठा आणि १० लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त केला. याप्रकरणी कंटेनर चालक संतोष हालगे याच्यासह सदाशिव गेरडे या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. 

कंटेनर मालकाने हार्डवेअरच्या मालाची वाहतूक करण्याचा परवाना घेतला असून तो अवैधरित्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याचे बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी प्रसारमाध्यमांना कळविले आहे. 

गोकाकचे पोलिस उपअधीक्षक डी. एच. मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.पी.मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुल्ला, पी. एम.अरबल्ली, एस.बी. पुजेरी, वाय. जी. गुंजगी, एस. एम. बागेवाडी, बी. के. नागरी आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी  यमकनमर्डी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.