- आयजीपी विकास कुमार यांचे आवाहन
- बेळगाव पोलिस आयुक्तालय - जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलिस ध्वज दिन कार्यक्रम
बेळगाव / प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीत पोलिसांचे काम खूप कठीण बनले आहे. पोलिस नसतील तर समाजात अशांतता निर्माण होईल. इतर विभागांच्या तुलनेत पोलिस विभाग हा अतिशय चांगला आहे. समाजात शांतता राखण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी पोलिसांनी आपले ज्ञान नेहमीच वाढवले पाहिजे, असे आवाहन आयजीपी विकास कुमार यांनी केले. बेळगाव पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा पोलिस दलाच्यावतीने मंगळवारी जिल्हा पोलिस मुख्यालयातील पोलिस परेड मैदानावर आयोजित पोलिस ध्वज दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मदारसाब इमामसाब वन्नूर उपस्थित होते.
यावेळी आयजीपी विकास कुमार पुढे म्हणाले, सायबर व अन्य गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आपले ज्ञान वाढवले पाहिजे. प्रत्येकाने केलेल्या कामाचा आदर केला पाहिजे' , पोलीस विभागातील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्तरावर समाज सुधारण्याची संधी आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. पोलिसांनी जनतेशी नम्रतेने वागावे व आदर राखावा असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी बेळगाव शहर राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, केएसआरपी आदी पोलिस पथकांनी शानदार पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. शहर पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
तर प्रास्ताविकात जिल्हा पोलिसप्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी १९६५ पासून दरवर्षी देशभरात सर्व राज्यांच्या पोलिस दलातर्फे २ एप्रिल रोजी पोलिस ध्वज दिन साजरा केला जातो. पोलिस विभागात काम करून निवृत्त झालेल्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मदारसाब इमामसाब वन्नूर यांनी पोलिसांनी कर्तव्याबरोबरच आरोग्य उत्तम राखणे महत्त्वाचे आहे.आपण २४ तास जनतेसोबत काम करत असतो. सेवाकाळात आपण कसे काम केले हे निवृत्त झाल्यावर कळते असे ते म्हणाले.
तर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा म्हणाले की, पोलिसांनी कर्तव्याबरोबरच आरोग्य उत्तम राखणे महत्त्वाचे आहे. आम्ही निवृत्त झाल्यावर २४ तास जनतेत मिसळून त्यांच्या वतीने काम करत होतो.आम्हाला माहित आहे की पोलिसांचे काम खूप कठीण असते. पोलिसांचे ज्ञान नेहमीच वाढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे व वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments