• बेळगावमधून जगदीश शेट्टर तर चिक्कोडीतून अण्णासाहेब जोल्लेंना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या
  • बेळगाव येथील प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

देशाच्या सर्वांगिण विकासासाठी येत्या ७ मे रोजी न चुकता मतदानाचा हक्क बजावून भाजपला मतदान करा. तसेच बेळगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर आणि चिक्कोडीचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना मतदान करून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार करत असताना रविवारी, बेळगाव मालिनीसिटी येथे आयोजित भव्य प्रचार सभेत मतदारांना संबोधित करताना ते बोलत होते. 

तत्पूर्वी प्रदेश भाजप नेत्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बैलगाडीची प्रतिकृती देऊन गौरव करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदींनी कन्नडमध्ये सौंदत्ती यल्लम्मा देवीचे स्मरण करून भाषणाला सुरुवात केली आणि बेळगावच्या मतदारांना शुभेच्छा दिल्या. मी राज्यात कुठेही गेलो तरी फिर एक बार मोदी ही घोषणा ऐकू येते असे त्यांनी सांगितले.

  • कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून कायदा - सुव्यवस्था ढासळली :

यावेळी नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर बेळगावात एका महिलेला विवस्त्र करून अपमानित करण्यात आले. चिक्कोडी येथे एका जैन साधूची हत्या करण्यात आली. तर हुबळी येथे नेहा हिरेमठ या विद्यार्थिनिची हत्या झाली. यावरून राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका त्यांनी केली.



  • मतांसाठी काँग्रेसकडून तुष्टीकरणाचे राजकारण :

काँग्रेसने कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव कलंकित केले आहे. मतांसाठी काँग्रेस  तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. देशद्रोही पीएफआय संघटनेने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या पक्षासोबत काँग्रेस सामील झाली आहे. देशाचे राजे महाराजांचे योगदान काँग्रेसला आठवत नाही ? नवाब आणि सुलतान यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही. यामुळे आगामी काळात काँग्रेस उद्ध्वस्त होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

  • काँग्रेसची सत्ता आल्यास विकास खुंटणार :

काँग्रेसची सत्ता आल्यास विकासाला खीळ बसणार आहे. कर्नाटकातही तीच स्थिती आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर रस्तेबांधणी, विजेचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिथे जिथे काँग्रेसची सत्ता येईल, त्या राज्याचा नाश होईल, असे ते म्हणाले. खोटे बोलून काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावला आहे. काँग्रेस महत्त्वाच्या मुद्द्यांवर खोटे बोलून देशात अराजकता निर्माण करत असल्याची जनतेत चर्चा आहे. काँग्रेसवाले मानसिकदृष्ट्या इंग्रजांच्या गुलामगिरीच्या भावनेने जगत आहेत. भारताचा विकास झाला तर भारतीय स्त्री सुखी होईल. पण काँग्रेस कधीच सुखी नाही. भाजपने कोरोना लस दिली, काँग्रेसचा त्या लसीला विरोध असल्याचे सांगून काँग्रेसच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडला.  


याप्रसंगी माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी, बेळगाव येथून जगदीश शेट्टर आणि चिक्कोडीतून अण्णासाहेब जोल्ले  १ लाखांहून अधिक मताधिक्क्याने प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करतील असा विश्वास व्यक्त केला. राज्यातील काँग्रेस सरकार कमकुवत आहे. त्यामळे राज्याच्या तिजोरीवर भार पडला असून तिजोरी रिकामी आहे. किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दिलेला ४ हजारांचा निधी काँग्रेसने थांबवला आहे. तेव्हा राज्यात २८ जागा जिंकून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.


या सभेला भाजपचे बेळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार जगदीश शेट्टर, चिक्कोडीतील उमेदवार अण्णासाहेब जोल्ले, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, भाजपचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.