- बेळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचे जनतेला आवाहन
- हिंडलगा येथे भाजपच्या बूथ लेव्हल कार्यकर्त्यांचा मेळावा
बेळगाव / प्रतिनिधी
देशाला आज नरेंद्र मोदींची गरज आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत, त्याप्रमाणे मी ही सेवेसाठी तत्पर आहे. तेव्हा आगामी निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन जनतेने मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केले. हिंडलगा येथे आज बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपच्या बूथ लेव्हल कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तेव्हा उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, माजी खासदार मंगला अंगडी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी, राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष विनय कदम, भाजप नेते नागेश मन्नोळकर, रामचंद्र मन्नोळकर, भाग्यश्री कोकितकर, दादागौडा बिरादर, स्नेहल कोलेकर, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जगदीश शेट्टर पुढे म्हणाले, मोदी आमचे नेते आहेत. पंतप्रधान कोण हे काँग्रेसला माहीत नाही. इंडिया आघाडी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारत नाही. काँग्रेसने आज आत्मविश्वास गमावला आहे. भाजपचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वांना घरी पाठवण्याचे मोदींची वादळ आले आहे. जम्मू- काश्मीर, पीओकेमध्ये आणखी एक काळा डाग आहे. ४०० जागा जिंकल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरही परत मिळेल. संपूर्ण देशातील सर्व नेत्यांना समान कायदा लागू आहे. त्यामुळेच आज देशाला नरेंद्र मोदींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माझेही बेळगावशी तीस वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. सुरेश अंगडी यांच्यासोबत भाजपच्या बांधणीसाठी आम्ही एकत्र काम केले. या भागाच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवण्याचे काम मी केले आहे. बेळगावच्या ग्रामीण भागात विकासाची कामे सुरू ठेवण्यासाठी मी कार्यरत आहे. बेळगाव शहर सुंदर करण्याचा, बेळगाव लोकसभा मतदारसंघ आदर्श बनवण्याचा संकल्प मी केला आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सक्षम करा. मी १७ रोजी उमेदवारी अर्ज सादर करणार आहे, तेव्हा सर्वांना बळ द्या. इतकी लोकांची उपस्थिती ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. ते खोटे आश्वासन देत आहेत. निवडणुकीनंतर या सरकारचे काय होईल हे सांगता येणार नाही, असे सांगून आपल्याला अधिक मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी मी माझ्या भावाला शब्द दिलाय म्हणून काही बोलत नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. बेळगावच्या ग्रामीण मतदारसंघात भाजपला २५ हजारांचे मताधिक्य मिळेल. शेट्टर दोन ते अडीच लाख मतांनी विजय मिळवत हुबळी, धारवाड आणि बेळगाव हे तिहेरी शहर बनवतील. येथील विमानतळाचा विकास करण्याचा प्रयत्न करू. आम्ही बेंगळुर आणि चेन्नईच्या मॉडेलवर इंडस्ट्री कॉरिडॉर बनवू, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार रमेश जारकीहोळी यांनी, राज्यात लवकरात लवकर डबल इंजिनचे सरकार बनवू, आम्ही आमचे सरकार म्हणून दोन्ही बाजूंनी विकास करू असा नवा गौप्यस्फोट केला. यातून निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सरकार पडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकार पडण्यात रमेश जारकीहोळी यांची महत्त्वाची भूमिका होती. आता राज्यात काँग्रेसचे सरकार पडणार आहे. काँग्रेस सरकारच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. हमींवर विश्वास ठेवून तुम्ही वाईट सरकार आणले. निवडणुकीनंतर वीज जाईल, बस बंद होईल, दोन हजार बंद होतील, अशा शब्दांत रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, बेळगाव लोकसभेच्या उमेदवाराला दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचे वचन आम्ही दिले आहे.विरोधी पक्ष पैसे देऊन निवडणुका घेतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ तास काम करून प्रमाणे राजकारण करतात. देशाचा विकास हे भाजपचे धेय्य आहे. भाजपच्या उमेदवाराला मत देऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया,असे ते म्हणाले.
खासदार मंगला अंगडी म्हणाल्या की, मोदी एक महान माणूस आहेत. ५०० वर्षांपासून लाखो कारसेवकांनी राममंदिरासाठी प्राण दिले आहेत. सर्व अडथळ्यांवर मात करत मोदींनी अयोध्येत राममंदिर बांधले, महिलांसाठी उज्वला योजना लागू केली आणि देशात आर्थिक सुधारणा आणल्याचे सांगितले. राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, काँग्रेस जात आणि मताचे विष पेरून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. कोरोनाच्या साथीत नरेंद्र मोदींनी विक्रमी लसीकरण करून भारताची ताकद काय आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिले.
भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, सुरेश अंगडी व जगदीश शेट्टर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रकल्प राबवून जिल्ह्याला विशेष योगदान दिले आहे. मोदींनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवले, राम मंदिर बांधले आणि देशात शांतता प्रस्थापित केली. आगामी काळात एक देश, एक निवडणूक, सर्वांसाठी एक कायदा, पीओके जिंकण्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवूया, अखंड भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण कठोर परिश्रम करूया, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय कदम, भाजपचे रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर यांच्यसह इतरांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी भाजप उमेदवार जगदीश शेट्टर, आ. रमेश जारकीहोळी यांच्यासह विविध नेत्यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बेळगाव ग्रामीण काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज घाडी व यल्लेश कोलकार यांनी केले. कार्यक्रमाला सर्व बूथ स्तरावरील कार्यकर्ते, हजारो संख्येने महिला तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments