सौंदत्ती / वार्ताहर  

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी सौंदत्ती तालुक्याच्या विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.


प्रारंभी सत्तीगिरी गावातील दुर्गादेवी व रामलिंगेश्वर मंदिराला भेट देऊन कार्यकर्त्यांसमवेत आशीर्वाद घेतला आणि देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. 

यावेळी गावातील नेते व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान  करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर इटनाळ या गावी प्रचार सभा घेत नरेंद्र मोदी यांनी देशभरात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्यक्षम राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी येथील मतदारांना दिले. भाजपच्या कार्यकाळातच बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे.

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी मतदार संघाचा कायापालट केला.केंद्र सरकारचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प बेळगाव मध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बेळगावचे विमानतळ व रेल्वे स्थानकाला अत्याधुनिक रूप देण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.


मंगला अंगडी यांनीही पाठपुरावा करत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. याच पद्धतीने बेळगावचा विकास साधला जाईल असे शेट्टर यांनी यावेळी सांगितले.




त्यानंतर सौंदत्ती मतदारसंघातील कोरकोप्प, सोपडल, रैनापूर, दासवळ, मल्लिकेरी, अक्कीसागर, कोडलीवाडा, तवलगेरी आणि कुरबगट्टी या गावांना भेटीतून प्रचार करण्यात आला. याप्रसंगी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन  करण्यात आले.



यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष  अनिल बेनके, महांतेश कवठगीमठ, विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी, रत्ना मामणी, विरुपाक्ष मामणी, इराण्णा चंदरगी, प्राचार्य सौरभ चोपडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.