• सीईएन पोलिसांची कारवाई 

विजयपूर / वार्ताहर  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयपूर जिल्हा पोलिसांनी शहरात धडक कारवाई करत सिंदगी बायपासजवळ अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बालाजी निक्कम, सचिन मोहिते दोघेही (रा. जि. सांगली, महाराष्ट्र) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचाकडून २ कोटी ९३ लाख ५० हजारांची रोख रक्कम, पैसे वाहतूक करण्यासाठी वापरलेली (MH-01/CD-7537) क्रमांकाची कार आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती विजयपूर जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिली आहे.  

हैद्राबादहून राज्यातील हुबळी येथे अवैधरित्या पैसे आणले जात असल्याच्या प्राप्त माहितीनुसार सोमवारी रात्री सीईएन पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्यासह कर्मचारी एम. के. हावडी, डी. आर. पाटील, एम. बी. पाटील, मल्लू हुगर यांनी ही कारवाई केली. या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.