खानापूर / प्रतिनिधी
गोव्याहून बागलकोटला जाणाऱ्या एका इनोव्हा चालकाचा वाहनावरील ताबा तुटल्याने इनोव्हा रस्त्याकडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एकाच कुटुंबातील ३ तर अन्य एक असे एकूण चारजण जखमी झाले. आज मंगळवारी दुपारच्या सुमारास होनकल (ता. खानापूर) नजीक ही घटना घडली. सागर कृष्णा देशपांडे असे अपघातातील मृताचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, सदर देशपांडे कुटुंबिय गोव्याला गेले होते. तेथून ते बागलकोटला बेळगाव मार्गे जात असताना होनकल - बेळगाव महामार्गावर होनकलनजीक चालकाला झोप आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याकडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून सुदैवाने इतर लोक बचावले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताचं खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठविला. तसेच उर्वरित ४ जणांना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र यापैकी आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गंभीर जखमी झालेल्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले आहे.
0 Comments