- शेतकऱ्यांनी पुन्हा बंद पाडले काम
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सुरु आहे. त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध सुरूच ठेवला आहे. अलारवाड रोड ब्रिज येथे आज बुधवारी सकाळी महामार्ग प्राधिकरणाकडून हे काम करण्यासाठी ठेकेदाराकरवी मशिनरी आणि मजूर आणण्यात आले होते. मात्र याची माहिती मिळताच रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्यांना विरोध केला. ते काम बंद पडत मशीनरी तिथून काढून सर्व्हिस रोडवर लावायला भाग पाडल्या.
यावेळी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी, हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरु करणाऱ्या सरकार आणि महामार्ग प्राधिकरणाचा तीव्र निषेध केला. हायकोर्टाची मनाई असतानाही या कामाची इतकी घाई का करण्यात येत आहे? असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न झाल्यास, येत्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी सरकारला चांगलाच धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला.
शेतकरी नेते राजू मरवे यांनीही या केसमध्ये जिल्हा न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यावर ही केस डिसमिस केली आहे. त्यामुळे सरकार किंवा महामार्ग प्राधिकरणाने हलगा-मच्छे बायपास करण्याचा निर्णय रद्द केला पाहिजे, शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरूच राहिल्यास शेतकरी सरकारला धडा शिवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी अलारवाड शिवारातील स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments