• बेळगाव शहर परिसरात जल्लोषी रंगपंचमी 

बेळगाव / प्रतिनिधी

एकीकडे  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता त्यातच दहावी परीक्षा यामुळे काहीसे निर्बंध असले तरी परंपरेचा प्रभाव जपत शहरवासियांनी रंगाचा उत्सव उत्साहात साजरा केला. बेळगाव शहर आणि उपनगरी भागात सोमवारी रंगोत्सवाचा जल्लोषी सोहळा रंगला. 'बुरा ना मानो होली है' असे म्हणत युवावर्गासह महिला व अबाल वृद्धांनी रंगोत्सवात सहभागी होत आनंद लुटला.यावेळी नागरिकांनी शहर परिसरात गर्दी केली होती. एकमेकांना रंग लावत सर्वांनीच आनंद द्विगुणीत केला. पुरुषांप्रमाणेच महिलांनी रंगोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

  • डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई 

शहरात आणि उपनगरी भागात पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्याचा प्रकार आजही जपलेला आहे. त्यामुळे सोमवारी नागरिकांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आल्याचे पाहायला मिळाले. शहरातील चव्हाट गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली , कंग्राळगल्ली, गोंधळी गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, टिळकचौक, रामलिंगखिंड गल्ली, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, शास्रीनगर, कित्तूर चन्नम्मा चौक यासह शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच चौकाचौकात एकमेकांवर रंगांची उधळण करत आणि डीजेच्या तालावर पाण्याच्या फवाऱ्याखाली बेभान नृत्य करताना तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 

  • पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरासमोर परंपरेप्रमाणे लोटांगणे 

बेळगाव शहराच्या पांगुळ गल्ली येथील सुप्रसिध्द अश्वत्थामाचे मंदिर एक प्रमुख आणि जागृत देवस्थान असून नवसाला पावणारे देवस्थान असल्याची ख्याती आहे. महाभारतातील एका योद्धयासाठी बांधलेल्या या देशातील दुसऱ्या अश्वत्थामा मंदिरामुळे पांगुळ गल्लीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. येथे दरवर्षी मागणी करून नवस फेडण्यासाठी लोटांगण घालून अश्वत्थामाला समर्पित भाव अर्पण केला जातो. 

यावर्षीही बहुसंख्य नागरिकांनी लोटांगणे घातली. यावेळी त्यांच्यावर पाईपने पाण्याचे फवारे उडविण्यात येत होते.

  • शहर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता त्यातच दहावी परीक्षेला सुरुवात होणार असल्याने शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनी याशिवाय अनोळखी युवती - महिलांवर रंग उधळू नये अशी सूचना जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी केली होती. त्यानुसार शहरातील प्रमुख मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रंगोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडून रंगाचा बेरंग होऊ नये, याकरिता विविध संवेदनशील ठिकाणी बसविलेल्या ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हुल्लडबाजी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून रंगोत्सवाला गालबोट लागू नये याकरिता पोलिसांनी खबरदारी घेतली होती. 

  • लेले मैदानावर सामूहिक होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिवर्षाप्रमाणे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी लेले मैदानावर सामूहिक होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथे युवा वर्गांसह ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बीच्या तालावर नृत्याचा आनंद घेत रंगोत्सवाचा आनंद लुटला. 

सकाळपासून सुरु झालेल्या या धुळवडीला दुपारपर्यंत उसंथ मिळाली नव्हती. मोटारसायकलीवरून दाखल होणारे तरुण आणि ठिकठिकाणी पाण्याचे फवारे लावून नृत्य करणारे तरुण दिसून आले. 


चेहऱ्यावर वेगवेगळे मुखवटे, चित्रविचित्र हावभाव, वेशभूषा तसेच रंगवलेले केस यामुळे या रंगोत्सवाला खऱ्या अर्थाने रंग चढला होता. 

एकंदरीत शहर आणि उपनगरी भागात पारंपारिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही जोपासण्यात येत आहे. त्यानुसार सणाचे पावित्र्य अबाधित राखून रंगोत्सव शांततेत पार पडला.

  • बेळगाव तालुक्यातील काही गावात उत्साही रंगपंचमी

बेळगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये धुलीवंदननंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (उ.), हिंडलगा, बेनकनहळळी गावांमध्ये होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. त्याप्रथेनुसार आज सुळगा (उ.), हिंडलगा आणि बेनकनहळळी येथेही उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. 


सकाळपासूनच गावातील गल्लोगल्ली रंगपंचमीसाठी  बालचमूंची लगबग दिसून आली. पिचकारी, रंगाचे फुगे घेऊन सर्वजण एकत्र आले एकमेकांना रंग लावून सप्तरंगात न्हाऊन निघाले.


शहराप्रमाणे गावातही रंगपंचमीसाठी वॉटर शॉवर आणि डीजेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. रंगोत्सवात तरुणाई सह ज्येष्ठ आणि वृद्धांचाही सहभाग लक्षवेधी ठरला. 

- बेळगाव तालुक्यातील रंगपंचमीची काही निवडक छायाचित्रे


- चिमुकल्यांची जेष्ठ व्यक्तींसह रंगपंचमी -  



- चिमुकल्यांची रंगपंचमी


कौटुंबिक रंगपंचमी -