- उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
- जागतिक जलदिनाची बेळगावकरांना थंडगार भेट
बेळगाव : चैत्राची चाहूल लागण्यापूर्वी उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसताना महाशिवरात्रीनंतर उन्हाचे चटके अधिकच तीव्र जाणवू लागले होते. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना यंदाच्या वर्षातील पहिल्याच वळीव पावसाने काहीसा दिलासा दिला आहे.
रणरणत्या उन्हात आज शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास शहर आणि परिसरात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आज वळीव पाऊस बरसणार या आशेने नागरिक प्रतिक्षा करत होते.
बेळगावच्या शहराच्या मध्यवर्ती भागासह टिळकवाडी, कंग्राळी (खुर्द) आणि बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आणि जानेवारी महिन्यापासूनच उष्मांकात झालेली वाढ आज काहीशी कमी झाली. होळीच्या दरम्यान वळिवाची हजेरी असतेच, असे मानले जाते. तामिळनाडूत देखील आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम वातावरणावर दिसून आला.
एकंदरीत गेले काही दिवस वळीव पाऊस होईल अशी शक्यता होती, मात्र प्रत्यक्षात पाऊस बरसला नव्हता. मात्र आज विजांच्या गडगडाटासह झालेल्या वळीव पावसाच्या सरी अपेक्षा इतक्या मोठ्या नसल्या तरी वातावरणात काही काळ गारवा पसरला.
0 Comments