- सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू
- पोलिस उपनिरीक्षक निलंबित
- जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांचा आदेश
![]() |
मृत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजयकांत मिकली |
बेळगाव / प्रतिनिधी
भीषण रस्ता अपघातात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. येरगट्टी (ता. बेळगाव) शहरात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेनंतर दोडवाड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नंदिश्वर यांना निलंबित करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी याबाबत आदेश दिला आहे.
या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, बैलहोंगल येथील दोडवाड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजयकांत मिकली यांचा येरगट्टी येथे अपघाती मृत्यू झाला. अपघातावेळी मिकली हे विना हेल्मेट दुचाकीवरून प्रवास करत होते. या घटनेला जबाबदार धरत दोडवाड पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षकालाच निलंबित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलिस स्थानकांना दुचाकी वरून फिरताना पोलिस कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करावे, याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी नोटीस बजावली होती. मात्र दोडवाड पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिकली यांनी अपघात झाला त्यावेळी हेल्मेट परिधान केले नव्हते. या घटनेला जबाबदार धरत जिल्हा पोलिस प्रमुखांनी सदर पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षकालाच निलंबित केले आहे.
वास्तविक पोलिस उपनिरीक्षकांनी स्थानकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवतेवेळी हेल्मेट परिधान करावे याबाबत सूचना करणे आवश्यक होते. मात्र असे असूनही मिकली यांचे अपघाती निधन झाले. पोलीस उपनिरीक्षक नंदिश्वर यांनी या घटनेची कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली नाही. परिणामी या बेजबाबदारपणामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
0 Comments