बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहर आणि उपनगरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर बेळगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागासह शहराच्या दक्षिण भागातील शहापूर, वडगाव, खासबाग येथे संस्थानकालीन परंपरेप्रमाणे आज पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात आली. 

सकाळपासूनच रस्त्यांवर तरुण, लहान मुले, युवती आणि महिलांनी एकमेकांवर रंग उधळत आनंद साजरा केला.  हातात रंगांच्या पिशव्या आणि पिचकाऱ्या घेऊन युवक-युवती दुचाकीवरून फिरत होते. त्यांनी समोर आलेल्यांवर रंगांची उधळण करत त्यांना होळीच्या शुभेच्छा देऊन मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. 

विविध आकारांचे मुखवटे घातलेल्या तरुण-तरुणींनी लक्ष वेधून घेतले. रेन डान्ससाठी खास उभारलेल्या मंडपांखाली पाण्याच्या कारंजाखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. डीजेवर लावलेल्या रिमिक्स, पारंपरिक लोकगीते आणि होळी-रंगपंचमीच्या खास गाण्यांच्या तालावर थिरकताना तरुणाईचा जल्लोष ओसंडून वहात होता. युवती व महिलानी रंगीत पाण्याने भरलेल्या घागरी तरुणांवर आणि वाहनधारकांवर ओतून करत रंगपंचमीचा आनंद लुटला. मतभेद विसरून अनेकांनी समूहाने एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावत आनंद द्विगुणित केला.


चेहऱ्याला चंदेरी वर्ख फासून मुखवटे, अंगावर पोती घालून, कमरेला झाडपाला गुंडाळून जंगली आदिवासींप्रमाणे हुंकार काढत, घुमत युवकांच्या एका समूहाने रंगपंचमीत खऱ्या अर्थाने रंग भरला. आयुष्यातील दुःख विसरून सर्वजण सप्तरंगाप्रमाणे आपले आयुष्य रंगीत बनवताना दिसत होते. जल्लोषी वातावरणात एकमेकांना भेटून गल्लीमध्ये कोपऱ्यावर, चौकात, गावाच्या वेशीत रंग उधळण्यात आले.

एकंदरीत रिमिक्स गाण्यांचा डीजेवर दणदणाट, रेन डान्सचा उल्हास अशा वातावरणात बेळगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागासह शहापूर,वडगाव आणि खासबाग येथे एकमेकांवर रंगांची उधळण करत जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली.