• शेतकरी, ऊस उत्पादक संघाची बेळगाव रेल्वेस्थानकावर निदर्शने

बेळगाव / प्रतिनिधी 

राज्य शेतकरी संघटना महासंघ आणि राज्य ऊस उत्पादक संघटना, जिल्हा संयुक्त कर्नाटक किसान मोर्चाच्यावतीने बेळगाव रेल्वे स्थानकावर आज शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या ५ हजार रुपयांची गरज नाही. मात्र पिकांना कायद्यानुसार योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी बोलताना ऊस उत्पादक संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष गुरुसिद्धप्पा कोटगी म्हणाले, केंद्र सरकारच्या एमएसपी कायदा लागू करण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत यापूर्वीच आंदोलन सुरू केले आहे. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याची मागणी त्यांनी केंद्राला केली आहे. नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा वर्षे झाली तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. केंद्र सरकारची ४०००/-, ५०००/- रुपयांची भीक आम्हाला नको. शेतकऱ्यांच्या पिकांना कायद्यानुसार योग्य मोबदला दिल्यास ते पुरेसे आहे. आम्ही स्वावलंबी शेतकरी आहोत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. आज रेल्वे रोखण्यासाठी आलो आहोत, भविष्यात तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला..

यावेळी बेळगाव जिल्ह्यातील राज्य रयत संघटना आणि कर्नाटक किसान मोर्चाच्या राज्य ऊस उत्पादक संघाचे सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.