• पंतप्रधान मोदींच्या आगामी निवडणूक प्रचार धोरणांवर आधारित अर्थसंकल्प

नवी दिल्ली दि. १ फेब्रुवारी २०२४

“देशाची प्रगती झाली की आमची प्रगती होते. चारही वर्गांना त्यांचे जीवन चांगले बनवण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता असते. त्यांचे सक्षमीकरण आणि कल्याण देशाला पुढे नेईल,” असे सीतारमण म्हणाल्या.

तासाभराच्या भाषणात आपला सहावा अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर केलेल्या बहुसंख्यवादाच्या टीकेचाही प्रतिकार केला. मोदी सरकारच्या उपाययोजनांचे वर्णन त्यांनी “कृतीतून धर्मनिरपेक्षता” असे केले.

भ्रष्टाचाराविरुद्धच्या सरकारच्या लढ्याबद्दल आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या चौकशीचा उल्लेख करत अर्थमंत्री म्हणाल्या, “पूर्वी सामाजिक न्याय ही केवळ राजकीय घोषणा होती. आपल्या सरकारसाठी सामाजिक न्याय काय आहे, हे कृतीतून दाखवून दिले आहे. तळागाळातील लोकांपर्यंत लाभ पोहचवण्याचा संपृक्त दृष्टिकोन ही सामाजिक न्यायाची खरी आणि व्यापक उपलब्धी आहे. हे सर्व आम्ही धर्मनिरपेक्ष कृतीतून केले. ज्यातून भ्रष्टाचार कमी करण्याचे आणि घराणेशाही रोखण्याचे आमचे ध्येय होते.”

सीतारमण पुढे म्हणाल्या, “यात पारदर्शकता आहे. जी तळागाळातील लोकांना लाभ पोहोचवण्याची आणि सर्व स्तरातील लोकांना संसाधन आणि सोई समान मिळेल याची हमी देते. आम्ही समाजात असणाऱ्या असमानतेकडे लक्ष देत आहोत आणि ही असमानता कशी संपवता येईल, यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही परिणामांवर लक्ष केंद्रित करतो खर्चावर नाही. जेणेकरून जनहितकारी सामाजिक-आर्थिक परिवर्तन साध्य होईल.”

भाजपाच्या विचारसरणीशी जुळणाऱ्या आणखी एका घोषणेमध्ये सीतारमण यांनी “जलद लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा व्यापक विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. “विकसित भारताच्या उद्दिष्टाला साध्य करण्याच्या आड येणाऱ्या आव्हानांना सर्वसमावेशकपणे सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांबाबत शिफारशी करेल,” असे त्या म्हणाल्या.

ऑक्टोबरमध्ये वार्षिक विजयादशमीच्या भाषणात आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांनी “सर्वसमावेशक लोकसंख्या नियंत्रण धोरण” आवश्यक असल्याचे सांगितले होते. हे धोरण सर्वांना समान लागू होईल. लोकसंख्या समतोल ठेवणे हे राष्ट्रीय हिताचे आहे, असे ते म्हणाले होते. २०१९ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही “लोकसंख्या विस्फोट”चा उल्लेख केला होता. त्याला आव्हान म्हणून संबोधले होते. केंद्र आणि राज्यांना हे हाताळण्यासाठी योजना आखण्याचेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते.

  • भाजपाला पुन्हा जनादेशाचा आशीर्वाद मिळेल

मोदी सरकारच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे कौतुक करताना सीतारमण म्हणाल्या, “२०१४ पूर्वीच्या काळातील आमच्या पुढे आलेले प्रत्येक आव्हान आम्ही आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाद्वारे पार केले. २०१४ नंतरच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयाने देशाला शाश्वत विकासाच्या मार्गावर आणले आहे. आमची योग्य धोरणे, योग्य निर्णय आणि खरा हेतू यामुळे हे साध्य झाले आहे.”

भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकांकडून पुन्हा एकदा जबरदस्त जनादेशाचा आशीर्वाद मिळेल, अशी आशा व्यक्त करत सीतारमण म्हणाल्या की, जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्पात आमचे सरकार विकसित भारतासासाठी एक विस्तृत रोड मॅप सादर करेल.”