बेळगाव / प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या बेळगाव गांधीनगर येथील राजवीर मेटल्स या भांडी दुकानात मंगळवारी रात्री उशिरा धाडसी चोरी करून सुमारे १५ लाखांचा लांबविण्यात आला. विशेष म्हणजे दुकानातील ८ सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, ग्राईंडरने कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर तांबे, पितळेचे आणि अल्युमिनियमची महागडी भांडी, कळशा आदी साहित्य ट्रकमधून भरून घेऊन लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात माहिती देताना दुकानाचे मालक देव जोशी यांनी सांगितले की, सुमारे ५० वर्षांपासून आपण हा व्यवसाय करतो. नुकतेच घर गहाण ठेवून आयडीबीआय बँकेतून दीड कोटींचे कर्ज काढून आपण भांडी खरेदी केली होती. लग्नाचा सीझन असल्याने तांबे-पितळ्याची भांडी जास्त प्रमाणात आणली होती. चोरटयांनी गोदामसदृश्य दुकानाच्या पुढील गेटमधून प्रवेश करून चोरी केली. ग्राईंडरने कुलूप तोडून आत प्रवेश करून सर्व ८ सीसीटीव्ही कॅमेरे फोडून भांडी चोरण्यात आली. बुधवारी पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला. चोरलेली भांडी ट्रकमध्ये भरून घेऊन चोरटे पसार झाले असा संशय त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी आपण माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद देणार असून पोलिसांनी कसून तपास करून चोरट्यांचा शोध घेऊन आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, देव जोशी हे यापूर्वी उद्यमबागमध्ये अभि स्टील नावाचे दुकान चालवत होते. तेंव्हाही त्यांच्या दुकानातून सुमारे ५ लाखांची भांडी चोरण्यात आली होती. त्यावेळी उद्यमबाग पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. आता दुसऱ्यांदा झालेल्या चोरीमुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले. एकंदर, कष्टाने व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांना चोरटयांनी असे लक्ष्य करणे हे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
0 Comments