• जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची पत्रकार परिषद 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. खानापूर पोलिसांनी १२ गुन्ह्यांचा छडा  लावल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

आज बेळगाव येथील जिल्हापोलिस प्रमुख कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बैलहोंगल, चिक्कोडी आणि खानापूर येथील चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना शोधण्यात यश आले आहे.

खानापूर पोलीस स्थानकांचे  पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने कसून तपास करून खानापूर येथील आरोपी परशुराम नाना गौंडाडकर याच्याकडून एकूण ६७३.४ ग्रॅम सोन्याचे दागिने व एकूण ६२७ ग्रॅम. चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक चन्नबसव बबली. सहाय्यक निरीक्षक एन. के. पाटील, हवालदार बी. जी. यलीगार, जगदीश काद्रोळी, जयराम हम्मनावर, पोलीस शिपाई मंजुनाथ मुसळी, प्रवीण होंडद, पुंडलिक मादार आणि बेळगाव तांत्रिक विभागातील विनोद ठकन्नावर या सर्वांनी दिवसरात्र कसून तपास करून गुन्हेगारांचा माग काढण्यात यश मिळवले, असे ते म्हणाले. जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी तपास पथकाचे कौतुक करून त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.