- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात समन्वय बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा मानस असल्याचे बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी सांगितले. बेळगाव शहरातील उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात मंगळवारी (दि. ९ जानेवारी) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आयोजित विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
राष्ट्रीय महामार्गापासून कित्तूर चन्नम्मा सर्कलपर्यंत ४.५० किमी. लांब उड्डाणपुलाच्या मार्गावर प्रमुख फेऱ्या आणि जंक्शन आहेत. हे लक्षात घेऊन पुरेसे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात वाढत्या वाहतुकीचे पुरेसे व्यवस्थापन होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संकेश्वरकडून येणाऱ्या वाहनांना केवळ उड्डाणपुलावरूनच नव्हे, तर सध्याच्या सर्व्हिस रोडवरूनही शहरात प्रवेश द्यावा; अवजड वाहने, पादचाऱ्यांची रहदारी यासह प्रत्येक घटकाचा विचार करून सर्वोत्कृष्ट योजना राबवावी, अशा सूचना आमदार आसिफ सेठ यांनी केल्या.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि करावयाची प्राथमिक तयारी सांगितली. बीएसएनएल, महानगर कॉर्पोरेशन, स्मार्ट सिटी, केएसआरटीसी, पेयजल पुरवठा आणि इतर विभागांनी समन्वयाने काम करून प्रकल्पाच्या पुरेशा अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
आमदार आसिफ सेठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध विभागांचा समावेश असलेल्या नवीन संकुलाच्या ब्ल्यू प्रिंटची पाहणी केली. सध्याच्या कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी. मुबलक पार्किंगची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.
0 Comments