• माजी आ. मनोहर किणेकर यांचे विचार
  • बेळगाव तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मादिन गांभीर्याने 

बेळगाव / प्रतिनिधी 

सीमावासियांनी सीमालढा अत्यंत जिव्हाळ्याचा बनवून मराठी अस्मिता टिकवण्यासाठी लोकशाहीतील सर्व लढे लढले. परंतु केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे व अन्यायी भूमिकेमुळे आजही सीमावासियांना न्याय मिळालेला नाही. आजही सीमावासीय त्या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून लढत आहेत, लढत राहतील आणि जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत ह्या हुतात्म्यांचे स्मरण करून लवकरच हा प्रश्न सोडवून घेऊ, या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली मिळेल, असे विचार माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बुधवार दि. १७ जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आल्यानंतर आयोजित केलेल्या सभेत व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी भाषावर प्रांतरचना करण्यात आली, त्यावेळी मुंबई राज्यातला मराठी भूभाग त्यावेळच्या म्हैसूर राज्यात अन्यायाने डांबण्यात आला. १७ जानेवारी १९५६ रोजी ही वार्ता नभोवाणीवरून कळविण्यात आली तेव्हा बेळगावमध्ये झालेल्या पहिल्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्रसाठी पहिले पाच हुतात्मे बेळगाव परिसरात झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिले रक्त बेळगावमध्ये सांडले आहे. मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराज झाला पाहिजे ही मागणी घेऊन सीमावासीय लढत होते. १९६० साली मुंबई ही महाराष्ट्रात मिळाली आणि उर्वरित भाग असाच अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात राहिल्याचे त्यांनी सांगितले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर होत्या.

तत्पूर्वी कंग्राळी येथील हुतात्मा बाळू निलजकर यांच्या समाधीला माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. वेशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील व यल्लाप्पा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. हुतात्मा चौक येथील हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यानंतर महात्मा फुले मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या ठिकाणी प्रास्ताविक ॲड. एम. जी. पाटील यांनी केले. मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला आर. आय. पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. तर बाळू निलजकर यांच्या प्रतिमेला माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर या सभेवेळी रामचंद्र मोदगेकर, मनोज पावशे, व अध्यक्षा रुक्मिणी निलजकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, शिवाजी सुंठकर, आर आय पाटील, बी. डी. मोहनगेकर, बी. एस. पाटील, प्रकाश शिरोळकर, आर. के. पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, गोपाळ पाटील, मनोहर संताजी, संतोष मंडलिक, सुरेश राजुकर, रावजी पाटील, दत्ता उघाडे, अनिल पाटील, सुनील अष्टेकर, निंगाप्पा मोरे, निंगाप्पा जाधव, नारायण सांगावकर, विनायक पाटील, शिवाजी पाटील, महादेव बिर्जे व इतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.