• जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे निर्देश 

बेळगाव / प्रतिनिधी 

नागरिकांमध्ये राज्यघटनेची मूल्ये आणि आकांक्षांची जागृती व्हावी, या उद्देशाने ‘संविधान जागृती अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. संविधान जागृती अभियाना संदर्भात ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

प्रजासत्ताक दिनी, संबंधित जिल्हा पालकमंत्री राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांमध्ये "संविधान जागृती" अभियानाचे उद्घाटन करतील. जागृती अभियानांतर्गत  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि इतर शासकीय कार्यालयांना भेट देऊन मूकपटाद्वारे संविधानातील मूल्ये आणि आकांक्षांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी बेंगळूर येथील पॅलेस मैदानावर आयोजित राज्यस्तरीय संविधान जागृती परिषदेत मूकपट सहभागी होणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

महिनाभर चालणारे जागृती अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा पंचायत, महसूल, पोलीस, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग, समाजकल्याण विभाग यासह प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरेपूर काम करावे. जिल्ह्यात प्रसारित होणारा स्थिरचित्रपट बेंगळूर येथील राजवाड्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने अभियान नीटनेटके असावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले. 

या बैठकीला जिल्हा नागरी विकास कक्षाचे नियोजन संचालक महांतेश कलादगी, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलपती राजश्री जैनापुर, माहिती विभागाचे उपसंचालक गुरनाथ कडबूर, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक डॉ. बसवराज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.