बेळगाव / प्रतिनिधी

मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी सीमालढ्यात प्राणाचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आज बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. शहरातील किर्लोस्कर रोडवर हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.

प्रारंभी मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर १७ जानेवारी १९५६ च्या पहिल्या व आजवरच्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

हुतात्मादिन अभिवादन कार्यक्रमापूर्वी हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रामदेव गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, अणसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौकापर्यंत मुक फेरी काढण्यात आली.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण- पाटील, रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, माजी महापौर सरिता पाटील, महेश नाईक, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शहरप्रमुख बंडू केरवाडकर, ॲड. राजाभाऊ पाटील, बी.ओ.येतोजी, आप्पासाहेब गुरव, अमर येळळूरकर, महेश जुवेकर, पंढरी परब, मनोहर हलगेकर, शिवाजी बोकडे, सतीश पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, सागर पाटील, शिवाजी हावळानाचे, सचिन केळवेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते  बहुसंख्येने उपस्थित होते.

  • महाराष्ट्रात जाण्याची प्रखर इच्छा दाखवून द्या ! - मालोजी अष्टेकर यांचे आवाहन  


हुतात्मा अभिवादन कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना माजी महापौर तथा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तेव्हा सीमाभागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात मनापासून सहभागी व्हावे व महाराष्ट्र जाण्याची प्रखर इच्छा दाखवून द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

तसेच एखाद्याला कन्नड भाषा वाढवण्याचे काम करायचे असेल तर त्यांनी ते जरूर करावे, मात्र सीमा भागातील मराठी भाषा संपविण्याचे काम कोणी करत असेल तर ती आम्ही सहन करणार नाही. कोणी काहीही सांगितले तर त्यांची बाजू घ्यायची आणि मराठी भाषिक जनतेवर अन्याय करायचा ही वृत्ती सोडून द्या, असा इशारा त्यांनी दिला.

कर्नाटक सरकार किंवा कन्नड संघटनांनी सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू ठेवल्यास त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू शकतात, याचे त्यांनी भान ठेवावे. महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी माणसासाठी  सुरू केलेल्या आरोग्य योजनांना अडकाठी आणली तर त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून येतील त्याला कर्नाटक सरकार व येथील प्रशासन जबाबदार असेल असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव  मंगेश चिवटे यांनी ठणकावले आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे असे त्यांनी सांगितले.  

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇



या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा