•  सुदैवाने जीवितहानी टळली 

खानापूर / प्रतिनिधी 

लाकूड वाहतूक करणारा भरधाव वेगातील ट्रक रस्त्यावरच उलटला. बेळगाव - पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी खानापूर ते गुंजी दरम्यान नायकोल नजीक रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अंधारात ट्रक रस्त्यानजीकच्या कठड्याला आदळल्याने अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. मात्र ट्रक रस्त्यानजीक असलेल्या काँक्रीट कामावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

खानापूर - रामनगर हा राष्ट्रीय महामार्ग अपघाताला निमंत्रण ठरत आहे. अर्धवट कामामुळे या रस्त्यावर नेहमी असे लहान-मोठे अपघात होत असताना प्रवाशांच्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावरून जाताना पर्यायी वळणदार रस्ते करण्यात आल्याने असे अपघात घडत आहेत. यासाठी तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करून सुखकर प्रवासासाठी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.