- मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची मागणी
- केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांची घेतली भेट
बेळगाव / प्रतिनिधी
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन केंद्र शासनाच्या प्रकल्पांसाठी अनुदान देण्याबाबत दीर्घ चर्चा केली. त्यांनी सखी वन केंद्र ,सखी निवास, शक्ती सदन, उज्ज्वल आणि स्वाधारा गृह यांसारख्या केंद्राने पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांसाठी अनुदान जाहीर करण्याची विनंती केली.
याशिवाय मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ICDS योजनेंतर्गत अंगणवाड्यांना मागील एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या तांदूळ आणि गहू पुरवठ्याकडे सहकारी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि तांदूळ आणि गव्हाचा पुरवठा तात्काळ सुरु करावा अशी मागणी केली. तसेच याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, यासह राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या ५१ तालुक्यांसाठी बालविकास कार्यालये मंजूर करून कर्मचारी देण्याची आणि सक्षम योजनेतील अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट क्लासरूममध्ये रूपांतर करण्याची विनंती केली.
लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्मृती इराणी यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ सर्व समस्यांबाबत सर्वंकष अहवाल द्यावा व अनुदान वाटपासाठी पावले उचलावीत,अशा सूचना दिल्या. यावेळी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे सचिव जे.सी.प्रकाश, मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी बी.एच. निश्चल उपस्थित होते.
0 Comments