• जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना
  • कोविड - १९ उत्परिवर्ती विषाणू JN-1 नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

फुफ्फुस आणि श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास तसेच लक्षणे असलेल्या लोकांनी तातडीने कोविड चाचणी करावी, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार  (दि. २१) रोजी  कोविड - १९ उत्परिवर्ती विषाणू JN-1 नियंत्रणासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आवश्यक पूर्वतयारीचे निर्देश त्यांनी दिले. 

शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर तपासणी नाके वाढवावे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कोविड चाचणी वाढवून अहवाल सादर करावा. फुफ्फुस आणि श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास आणि समस्या तसेच लक्षणे असलेल्या लोकांनी तातडीने कोविड चाचणी करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे ते म्हणाले.  ताप, खोकला, सर्दी इत्यादी श्वसन संसर्गाची लक्षणे दिसतील त्यांनी तातडीने आवश्यक वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि कोविड नियंत्रणासाठी खबरदारीच्या उपायांचे पालन करावे, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, तालुका रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी व तहसीलदारांनी रुग्णालयांना भेटी देऊन खाटांची उपलब्धता सातत्याने तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस प्रकरणे वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वीही आपण गंभीर परिस्थितीचा सामना केला आहे. हे लक्षात घेऊन बेडवर ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रूग्णालयात दाखल रूग्णांच्या सोबत असलेल्या अटेंडंट्सनी रूग्णापासून अंतर ठेवावे आणि मास्क अनिवार्यपणे परिधान करावा.  

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रावण नायक, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, जिल्हा शल्य चिकित्सक विठ्ठल शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी यांच्यासह सर्व तालुका तहसिलदार, विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.