बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील कंग्राळ गल्लीतील ड्रेनेज चेंबरमध्ये सुमारे तीन महिन्यांचे मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्याच्या तक्रारीवरून महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी बेळगावातील कंग्राळ गल्ली येथे गेले असता,ड्रेनेज चेंबरमध्ये त्यांना एक मृत अर्भक आढळून आले. यानंतर तात्काळ स्थानिक नगरसेवक शंकर पाटील व स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच नगरसेवक शंकर पाटील यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सफाई कामगारांनी पाणी काढून ड्रेनेज चेंबर साफ करताना अर्भक पाईपमध्ये अडकल्याची माहिती दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वच्छता कर्मचारी सुरेश म्हणाले की, ड्रेनेज चेंबर तुंबल्याची तक्रार आल्यानंतर आम्ही साफसफाई सुरू केली. सर्व चेंबर स्वच्छ केले. यावेळी मधल्या चेंबरमध्ये बाहुलीसारखी वस्तू आढळून आली. त्यामुळे आजूबाजूच्या घरातील महिलांना बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक नगरसेवक शंकर पाटील यांनी म्हणाले, कंग्राळ गल्लीतील ड्रेनेज चेंबर तुंबल्याची तक्रार आल्यानंतर शनिवारी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सफाई करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये एक मृत अर्भक ओझरते आढळून आले होते. यावेळी पाण्याचा मोठा फवारा मारून ड्रेनेज लाईन स्वच्छ करताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते अर्भक पुढे पाईपमध्ये जाऊन अडकून बसले. तेव्हा सफाई कार्मचाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले नाही.
आज पुन्हा त्याठिकाणी ड्रेनेज चेंबर तुंबण्याची समस्या उद्भवल्याने, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता. त्यांनी ड्रेनेज चेंबरमध्ये मृत अर्भक आढळल्याची माहिती दिली. त्यानुसार ड्रेनेजमध्ये आढळलेले मृत अर्भक ३-४ महिन्याचे असावे. पहिल्यांदाच हा अनुभव आल्याने पुढे काय करायचे ते आम्हाला कळत नाही. त्यामुळे आम्ही सदर प्रकाराची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिली असून ते आल्यानंतर पुढे काय करायचेते ठरवू, असे सांगितले.
दरम्यान, कंग्राळ गल्लीतील गजबजलेल्या रस्त्यावर अशी घटना घडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. संबंधित अर्भक ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच ते अर्भक आहे की गर्भ हे स्पष्ट होईल.
0 Comments