खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर रेल्वे स्थानकाजवळ, एका युवकाचा हालात्री नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. ‌रवी कृष्णा बडलमगोळ (वय २४, रा. जुना मन्सापूर रस्त्यानजीक असलेली वसाहत) असे मृत युवकाचे नाव आहे. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार, रवी कृष्णा बडलमगोळ हा आपल्या मित्रांसमवेत हालात्री नदीच्या किनाऱ्यावर पार्टीला गेला होता. पार्टी करून जेवल्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेला असता, नदीपात्रातील डोहात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची त्याच्या  कुटुंबियांना माहिती  मिळाल्यानंतर या ठिकाणी पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पहाटे ६ वा. शोधकार्य सुरु करण्यात आले. रवी बडलमगोळ हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील येथील एका टाईल्स कारखान्यात  काम करतात. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.