- भाजपतर्फे ३ डिसेंबर रोजी बेळगावात कर्नाटक राज्य सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन
- भाजप नेते रविकुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकातील काँग्रेस सरकार राज्याचा विकास साधण्यात अपयशी ठरले आहे. राज्य सरकारच्या या अपयशाचा निषेध करण्यासाठी येत्या १३ डिसेंबर रोजी भाजपतर्फे बेळगावात कर्नाटक राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन होणार असल्याची माहिती भाजप नेते तथा विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यापत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय.विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, माजी मंत्री बी.श्रीरामुलू यांच्यासह २५ हजार भाजप कार्यकर्ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
१२५ वर्षांत एवढा मोठा दुष्काळ पडला नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु आतापर्यंत १२५ जणांनाही भरपाई दिलेली नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी भरपाई दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याकांच्या हितासाठी १० हजार कोटींची नुसती घोषणा केली ही उपरोधिक बाब असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना विजेची कमतरता भासत असून त्यांना पुरेसा वीजपुरवठा केला जात नाही. दुष्काळात सरकारने बोअरवेलसाठी जाचक अटी घातल्या आहेत. बोअरवेलसाठी शेतकर्यांनाच लाखो रुपये खर्च करणे बंधनकारक केले आहे, असे सांगता त्यांनी खडसावले. सरकारने उत्तर कर्नाटक सिंचन योजनेसाठी निधी दिलेला नाही. आजपर्यंत १ किमीचा रस्ता तयार होऊ शकला नाही. एसटीने हमी योजनांचे ११ हजार कोटी रुपये परत करावेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुखांनी केलेल्या अरेरावी विरोधात सभागृहातही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, काँग्रेस सरकार हमी योजनांच्या नावाखाली जनतेची फसवणूक करत आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना असलेली किसान सन्मान योजना रद्द करून त्यातील निधीचा गैरवापर केला आहे, सरकारने एससीएसटी अनुदानाचा अपहार केला आहे. अनेक योजनांच्या निधीची काँग्रेसकडून हमीभावाच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले
या पत्रकार परिषदेला बेळगाव महानगर भाजपचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.अनिल बेनके, बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील, भाजप प्रवक्ते ॲड. एम. बी. जिरली, भाजप नेते रवी पाटील उपस्थित होते.
0 Comments