- दक्षिण आफ्रिकेचा ८३ धावांत खुर्दा
- टीम इंडियाचा २४३ धावांनी दणदणीत विजय
- विराट कोहलीचे शतक अन् जाडेजाचे पाच बळी
कोलकाता दि. ५ नोव्हेंबर २०२३ : भारताने विश्वचषकात सलग आठव्या विजयाची नोंद केली. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी विराट पराभव केला. रवींद्र जाडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजी करताना त्याने जबराट फिनिशिंग केले, त्यानंतर गोलंदाजीत त्याने पाच विकेट्स घेतल्या. विराट कोहलीने 49 वे वनडे शतक ठोकले. त्याशिवाय श्रेयस अय्यरने अर्धशतकही ठोकले. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने दिलेल्या 327 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. भन्नाट फॉर्मात असेलला क्विंटन डिकॉक अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याला त्रिफाळाचीत बाद केले. त्यानंतर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. 40 धावांवर आफ्रिकेचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. जाडेजा आणि शामी यांच्या माऱ्यापुढे आफ्रिकेने गुडघे टेकेले. टेम्बा बवुमा याने 11 धावा जोडल्या. रासी डुसेन याने 13 धावा केल्या. त्याशिवाय मार्के यान्सन याने 14 धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 15 धावसंख्याही ओलांडता आली नाही. मार्को यान्सन याने सर्वाधिक 14 धावांची खेळी केली. क्विंटन डिकॉक, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि एनगिडी यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. टेम्बा बवुमा 11, डुसेन 14 आणि मार्को यान्सन 14 यांनाच फक्त दुहेरी धावसंख्या ओलांडता आली. स्पर्धेत तुफान फॉर्मात असणारी आफ्रिकेची फलंदाजी भारताच्या माऱ्यापुढे सपशेल अपयशी ठरली.
भारताकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 9 षटकात 33 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. जाडेजाने कगिसो रबाडा, केशव महाराज, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन आणि टेम्बा बवुमा यांना तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद शामी याने दोन फलंदाजांना माघारी झाडले. शामीने 4 षटकात 18 धावा खर्च केल्या. कुलदीप यादवने 5.1 षटकात सात धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. सिराजने 4 षटकात 11 धावा दिल्या. बुमराहने 5 षटकात फक्त 14 धावा दिल्या.
- विराटचे शतक, भारताचा 326 धावांचा डोंगर -
तत्पूर्वी, भारताची सुरुवात खूपच आक्रमक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर तुटून पडत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ९० धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ४० धावा करून बाद झाला. रोहित शर्माने शुबमन गिलसह ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. रोहित २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
शुबमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. ९३ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी १३४ धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद २२ धावा केल्या.
विराटने ४९व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने २९ धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
0 Comments