बेळगाव / प्रतिनिधी 

बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता मंगळवार दि. २१ रोजी वंदे भारतची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे बेळगावकरांना प्रत्यक्ष वंदे भारत एक्स्प्रेस पाहण्याची संधी मंगळवारी उपलब्ध होईल. चाचणी यशस्वी झाल्यास डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे.

बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेस आता बेळगावपर्यंत धावणार असल्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने. नैऋत्य रेल्वेने वंदे भारतचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला होता. बेळगावमधील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी वंदे भारतसाठी पाठपुरावा केल्यामुळे अखेर मंजुरी देण्यात आली. मंगळवार दि. २१ रोजी वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी होणार आहे. पहाटे ५.४५ वाजता बेंगळूर येथून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी १.३० वाजता बेळगावला पोहोचेल. तर दुपारी २ वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस रात्री १०.१० वाजता बेंगळूरला पोहोचेल. नैऋत्य रेल्वेने शुक्रवार दि. १७ रोजी एक पत्रक काढून वंदे भारतसाठी चाचणी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बेळगावमधील प्रवाशांना वंदे भारत धावताना पाहता येणार आहे. या एक्स्प्रेसला आठ डबे जोडले जाणार आहेत.