बेळगाव / प्रतिनिधी
काळ्यादिनी निषेध फेरीत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे , सरिता पाटील, रणजित चव्हाण - पाटील, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातखांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, एम. जे. पाटील, आर .एम. चौगुले, नेताजी जाधव, सरस्वती पाटील, विकास कलघटगी आदींचा समावेश आहे.
बेळगावसह सीमा भागातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी काळ्यानिमित्त मुक सायकल फेरी काढून निषेध नोंदवण्यात येतो. यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीने काळ्यादिनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ धर्मवीर संभाजी मैदान येथून काढलेल्या मुक सायकल फेरीला व्यापक प्रतिसाद लाभला. या फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते. त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन कन्नड भाषिकांच्या भावना व कर्नाटकच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मार्केट पोलिसांनी स्वतःहून १८ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
0 Comments