खानापूर / प्रतिनिधी 

मेंढरांचा कळप आडवा आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात हल्याळहून खानापूरकडे येणाऱ्या केएसआरटीसी बसची झाडाला धडक बसल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. नंदगड बिडी मार्गावरील कुणकीकोप क्रॉसनजीक हा अपघात झाला. माला शिवाप्पा तलवार (वय ५०) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला करीकट्टीहून बेळगावकडे जात होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे. उपचासाठी तिला नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर मार बसला असून एक पाय फ्रॅक्चर झाला असल्याचे समजते. नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तिला बेळगावला पाठविले आहे. या अपघातात बसची समोरील काच फुटली असून, समोरील बाजूचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातात सर्व मेंढरांचा जीव वाचला आहे.