• बेळगावात हिडकल येथील शेतकऱ्यांची निदर्शने
  • भीमाप्पा गडाद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी 

हिडकल जलाशयाच्या बॅक वॉटर मध्ये जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांच्या ५८ हून अधिक कुटुंबांना जमीन वाटपाचे आदेश देऊन ४३ वर्षे झाली आहेत. यांना वाटप झालेल्या जमिनी आणि भूखंड कोठे आहेत ते माहित नाही. मात्र १३ वर्षांपासून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने येथील शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  पर्यायी जमिनीच्या मागणीसाठी निदर्शने करत सामाजिक कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन दिले.

१९८० मध्ये हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमुळे जमिनी गमावलेले शेतकरी ४३ वर्षांपासून पर्यायी जमिनी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तेव्हा तातडीने शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढावा तसेच हिडकल जलाशयातील देरनहोळे, मनगुत्ती, इस्लामपूर, गुडनट्टी, जुनी वंटमुरी आदि गावातील ५८ हून अधिक कुटुंबांच्या सुपीक जमिनी गेल्या असून याची दखल घेऊन जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी, बेळगाव जिल्ह्याच्या ३५ गावातील शेतकरी जमिनी गमाविल्याने बेघर झाले असून शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १५ डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी आणि शासनाने याकडे लक्ष न दिल्यास  तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.