• सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय 
  • मोहम्मद शामीच्या सात विकेट

मुंबई दि. १५ नोव्हेंबर २०२३ : 

वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात (World Cup 2023 Semifinal) टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. किवींनी दिलेल्या चिवट झुंजीमुळे सामना अधिक रोमांचक झाला होता. मात्र, आता न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून टीम इंडियाने फायनलमध्ये (India into the Final) दणक्यात प्रवेश केला आहे. डॅरिल मिशेल याच्या वादळी शतकामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती. मात्र, मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सात विकेट घेत न्यूझीलंडला वर्ल्ड कपमधील प्रवास थांबवला. कॅप्टन कुल केन विलियम्सनने मिशेलला मोलाची साथ दिली होती. मात्र, शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला. 

सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे आव्हान ठेवले  होते. टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून ३९७ धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी सर्वाधिक धावांचे  योगदान दिले. विराटने ११७ आणि श्रेयसने १०५ धावांची खेळी केली. आपल्या वैयक्तिक ५० व्या शतकाला गवसणी घालत विराट कोहलीने इतिहास रचला. तर श्रेयस अय्यर याने देखील शतक ठोकत टीम इंडियाला ४०० च्या जवळ पोहोचविले. त्याचबरोबर शुभमन गिल याने ८० धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला ३९७ धावा उभारता आल्या होत्या.

भारताने दिलेल्या ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. न्यूझीलंडचे  सलामीचे  दोन्ही फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. डेवेन कॉनवे याला फक्त १३ धावा करता आल्या. रचिन रविंद्र यालाही मोठी खेळी करता आली नाही. रचिन रविंद्र याने २२ चेंडूत १३ धावा केल्या. ३९ धावांत न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी झुंज दिली. केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी भारताच्या गोलंदाजांचा प्रतिकार केला. केन विल्यमसन याने संयमी फलंदाजी केली तर डॅरेल मिचेल याने हल्लाबोल केला. मिचेल आणि केन विल्यमसन यांच्यामध्ये १८१ धावांची भागिदारी झाली. ही जोडी मैदानावर होती, तोपर्यंत सामना न्यूझीलंड जिंकेल असेच वाटत होते. पण भारताने पुन्हा एकदा कमबॅक केले. मोहम्मद शामीने एकाच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. आधी जम बसेलेल्या केन विल्यमसन याला तंबूत पाठवले. त्यानंतर टॉम लॅथम याचाही अडथळा दूर केला. केन विल्यमसन याने ७३ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता. केन विल्यमसन याने विराट कोहलीप्रमाणे एक बाजू लावून धरली. पण त्याला शतकामध्ये रुपांतर करता आले नाही. विल्यमसन याच्यानंतर टॉम लेथमही शून्यावरच परतला. लेथम गेल्यानंतर ग्लेन फिलिप्सने डॅरेल मिचलला साथ दिली. डॅरेल मिचेल याने ग्लेन फिलिप्स याला हाताशी धरत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पाचव्या विकेट्ससाठी या दोघांमध्ये ६१ चेंडूत ७५ धावांची भागिदारी झाली. ही जोडी धोकादायक ठरते की काय? असेच वाटत होते. पण बुमराहने ग्लेन फिलिप्सचा अडथळा दूर केला. फिलिप्सने ३३ चेंडूत दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. फिलिप्स तंबूत परल्यानंतर मार्क चॅम्पमनही तंबूत परतला त्याला कुलदीपने तंबूचा रस्ता दाखवला. चॅम्पमन बाद झाल्यानंतर शामीने जम बसलेल्या डॅरेल मिचेल यालाही बाद करत भारताच्या विजय निश्चित केला. पण औपचारिकता बाकी राहिली होती. अष्टपैलू मिचेल सँटनर यालाही फक्त आठ धावांचे योगदान देता आले, त्याला सिराजने बाद केले.

डॅरेल मिचेल याने एकाकी झुंज देत भारताच्या माऱ्याचा यशस्वी प्रतिकार केला. डॅरेल मिचेल याने ११९ चेंडूमध्ये १३४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये सात षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश होता. डॅरेल मिचेल याने आधी कर्णधार केन विल्यमसन याच्यासोबत १७१ धावांची भागिदारी केली. त्यानंतर फिलिप्ससोबत ७१ धावांचीही भागीदारी केली. 

फायनलमध्ये भारताविरुद्ध कोण?

वर्ल्ड कपचा दुसरा सेमीफायनल सामना उद्या म्हणजेच १६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवला जाईल. या दोन्ही संघातील विजयी टीम १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात फायनलमध्ये टीम इंडियाशी दोन हात करणार आहे.