बेळगाव / प्रतिनिधी
भ्रष्टाचारा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात अडथळा आहे. भ्रष्टाचार कमी असलेल्या देशांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. देशातील न्यायव्यवस्था कार्यपद्धती आणि विधिमंडळात भ्रष्टाचार निर्मूलन शक्य आहे. यातून देशाच्या सुवर्ण काळाची सुरुवात होणार असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य मुरली मोहन रेड्डी यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कर्नाटक लोकायुक्त आणि बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (३ नोव्हेंबर) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक "जनजागृती सप्ताह - २०२३" कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारी कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी संघटितपणे काम करायला हवे , भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अनेक जण स्वतःच्या पुढाकाराने धडपडत असून अशा लोकांना पाठबळ दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंत राय म्हणाले, केंद्रीय दक्षता आयोग आणि राज्यातील लोकायुक्त भ्रष्टाचारा विरोधात काम करत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी "भ्रष्टाचाराचा प्रतिकार ,राष्ट्राला समर्पित" हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त पी.व्ही.स्नेहा, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, अन्न विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक राजीव कल्लूर, लीड बँकेचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी गौतम, डॉ. बंगारप्पनवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments