बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील एपीएमसी आणि जय किसान होलसेल भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांमध्ये मार्केटवरून संघर्ष सुरु आहे. मात्र दोन्ही ठिकाणी  व्यापाराची संधी आहे. यासाठी  एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सामंजस्याने चर्चा करून व्यवहार सुरळीतपणे पार पाडावे अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. मंगळवार (दि. १० ऑक्टोबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोलाविलेल्या एपीएमसी व जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघाच्या सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

वाहतूक समस्या, व्यवसायात झालेली घसरण, शेतकऱ्यांचे बाजारात येण्याचे घटलेले प्रमाण यासह विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एपीएमसी मार्केट व्यापारी संघाच्या सदस्यांनी सकाळी एका भाजी मार्केटमध्ये तर सायंकाळी दुसऱ्या भाजी मार्केटमध्ये बाजार भरविण्यात यावा अशी सूचना केली. मात्र जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघाच्या सदस्यांनी ती सूचना मान्य केली नाही. किल्ला भाजी मार्केट एपीएमसीमध्ये स्थलांतरित केल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच आम्हाला पोट भाडेकरू म्हणून वेठीस धरले होते. आता आम्ही स्वतंत्र मार्केटची  उभारणी केल्यामुळे एपीएमसी भाजी मार्केट ओस पडल्याने आमच्यावर आरोप होत असल्याचे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी संघाचे सदस्यांनी सांगितले.

दरम्यान दोन्ही मार्केट सुरू राहण्याची गरज दोन्ही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सामंजस्याने आपापसात चर्चा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. तोडगा न निघाल्यास  मंत्री व आमदारांच्या उपस्थितीत दुसरी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. या बैठकीला जि. पं. मुख्यकार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्यासह एपीएमसी व जय किसान भाजी मार्केटचे व्यापारी उपिस्थत होते.