विजयपूर / राहुल आपटे 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकची धडक बसून चौघेजण जागीच ठार झाले. विजयपूर शहरातील विजयपूर-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५२) वर काल मंगळवारी रात्री ११ वा. सुमारास इटंगीहाळ टोलनाक्यानजीक एका हॉटेलजवळ ही घटना घडली. प्रवीण संगनगौडा पाटील (वय ३१), शिवानंद बसवराज चौधरी (वय २४), इराण्णा अण्णाराया कोल्लार (वय २६), सुनीलप्रभू खानापूर (वय २६) सर्वजण (रा. विजयपूर ) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर ट्रकचालक सुरज शिंदे (रा. ता. चडचण, जि. विजयपूर) हा अपघातानंतर  ट्रक घटनास्थळीसोडून फरार झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार प्रवीण, शिवानंद, इराण्णा व सुनीलप्रभू हे चौघे मित्र स्वतःच्या ताब्यातील (KA-22 EZ-7126) व (KA-28 W-9952) क्रमांकाच्या दुचाकींवरून काल मंगळवार (दि. १७ ऑक्टोबर) रोजी रात्री विजयपूर पासून १० कि.मी.अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गानजीकच्या एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर महामार्गानजीक दुचाकी जवळ उभारले असताना, विजयपूर हून बेंगळूरच्या दिशेने निघालेल्या  (MH -12, QW-8521) क्रमांकाच्या ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् ट्रकची या चौघांना धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती की, धडक बसताच चौघेही जागीच गतप्राण झाले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच विजयपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विजयपूर येथील सरकारी रुग्णालय पाठविले. या घटनेची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.