• अतिवाड येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 
  • जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

तलावासाठी संपादित केलेल्या सुपीक शेत जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी करत, आज बेळगाव तालुक्यातील बेकिनकेरे ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या अतिवाड गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले.

पाणी टंचाईची समस्या सोडविण्याकरिता शेत तलाव उभारणीसाठी लघुपाटबंधारे विभागाने अतिवाड गावातील सुमारे ४० शेतकऱ्यांची ६० एकर सुपीक शेत जमीन संपादित केली असून त्या बदल्यात आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तेव्हा सुपीक जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळावी  या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

सन २००७ मध्ये संजय पाटील आमदार होते. यावेळी ४० शेतकऱ्यांची सुमारे ६० एकर जमीन संपादित करण्यात आली. पाणीटंचाई  तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जमीन देऊनही १५ वर्षे उलटून गेली. मात्र राज्य सरकारने अद्यापही भरपाई दिली नाही. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी असे शेतकरी महिला रुक्मिणी कांबळे यांनी सांगितले. तर नजीकच्या काळात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडेही जमिनीच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. तरीही १४ ते १५ वर्षांपासून कोणतीही नुकसान भरपाई अथवा मोबदला देण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात आनंद पाटील, कल्लाप्पा, विजय पाटील यांच्यासह अतिवाड येथील चाळीसहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.