बेळगाव / प्रतिनिधी
अतिवाड (ता. बेळगाव) या बेकिनकेरे ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन लघु पाठबंधारे खात्याकडून तलाव निर्माण करण्यासाठी २००७ मध्ये संपादित केली आहे. मात्र अद्यापही संबंधित शेतकऱ्यांना कोणतीच भरपाई देण्यात आली नाही. त्वरित याचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
तलाव बांधून १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. मतदारसंघातील माजी आमदार तसेच विद्यमान आमदार आणि मंत्री यांच्याकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा याच तलावात बुडून जीवन संपविण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.यावेळी अतिवाड येथील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments