• बेळगावात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे आंदोलन 
  • जिल्हा प्रशासनाला सादर केले निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

कांताराज आयोगाने २०१५ मध्ये दिलेला अहवाल मान्य करून मुस्लिमांचे २ 'बी' आरक्षण ८ टक्के करावे, या मागणीसाठी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज बेळगाव शहरात तीव्र आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 


याप्रसंगी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते मातुनादी म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता आल्यास  आम्ही कांताराज अहवाल लागू करू असे आश्वासन काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन पाच महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी केली नाही हे निषेधार्ह आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने काम करावे, मुस्लिमांसाठीचे २ 'बी' आरक्षण ८ टक्के करण्यात यावे, असे ते म्हणाले.सामाजिक न्याय आणि सर्व घटकांच्या कल्याणाचा हेतू असलेल्या कांताराजू आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देणारा काँग्रेस पक्ष आपल्या आश्वासनापासून दूर जात असल्याची तक्रार त्यांनी केली. 

आता सरकारने आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास येत्या काळात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने  राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

याप्रसंगी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे तबरेज शेख, झाकीर नाईकवाडी, आश्रफ फिरकोटे, इम्रान अत्तार, मल्लिकाजान महम्मद ताहिर आदी उपस्थित होते.