• छत्रपती शिवाजी उद्यानानजीक आंदोलन
  • भ्रष्टाचाराविरोधात पालकमंत्र्यांना निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव स्मार्ट सिटीचे निकृष्ट काम व त्यातील भ्रष्टाचाराचा बेळगावकर जनतेने आज तीव्र निषेध नोंदविला. शहरातील छत्रपती शिवाजी उद्यानानजीक आंदोलन करून याबाबत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारून मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील  विविध कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि बुडा येथील गैरप्रकाराची लवकरच चौकशी केली जाईल. तसेच भाजप आमदार अभय पाटील यांच्या विरोधात जनतेने तक्रारी केल्या असून  जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन चौकशी करून दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

तत्पूर्वी महिलांनी माती आणि दगडांनी भरलेल्या टोपल्या घेऊन भाजप आमदार अभय पाटील यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढला. 

याप्रसंगी निषेध व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद म्हणाले, शहापूर  बँक ऑफ इंडिया ते जुना पीबी रोड रस्ता रुंदीकरणात निष्पाप लोकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. हा रस्ता पूर्णत: अशास्त्रीय असून दोषी अधिकाऱ्यांची  उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, विशेषत: शहापूर बँक ऑफ इंडियापासून जुन्या पीबी रोडचे रुंदीकरण करताना बेळगाव स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना सोयीस्कर पद्धतीने रस्ता बनविला आहे. शहापूर बँक ऑफ इंडिया ते पीबी रोडपर्यंत रस्ता रुंदीकरण योग्य नाही. घरे गमाविलेले नागरिक न्यायालयात गेले होते. न्यायालयाने स्मार्ट सिटीला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. परंतु न्यायालयाचा निकाल असतानाही बुडा आयुक्तांनी बेकायदेशीरपणे रस्ता रुंदीकरण केले आहे. या कामात जनतेच्या कराचा पैसा वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या नुकसानीची भरपाई वसूल करावी, स्मार्टसिटीची कामेही पूर्णपणे अशास्त्रीय आहेत. शहापूर बँक ऑफ इंडिया ते जुना  पी.बी. रोड हा रस्ता प्रवासासाठी सोयीचा नाही. जनतेच्या सोयीसाठी या रस्त्याची शास्त्रोक्त पद्धतीने तातडीने दुरुस्ती करावी. एकूणच केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्टसिटीची कामे दर्जेदार नाहीत. रस्त्याची कामे अशास्त्रीय व निकृष्ट दर्जाची असून, त्याची लवकर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आम आदमी पक्षाचे नेते राजीव टोपण्णावर म्हणाले, काँग्रेस रोडसह काही भागात पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहत नाही. स्मार्टसिटी कृती आराखडा तयार करताना सुरुवातीला रॉयल कॅनॉल आणि प्राथमिक कालवे विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र आता कालवे विकसित झालेले नाहीत. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.शहरातील बहुतांश कामे मुख्य ठेकेदाराशिवाय उपकंत्राटदारांकडून केली जात आहेत. त्यामुळे काही कामांमध्ये गुणवत्ता राखणे शक्य होत नाही. काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सिमेंट रस्ता सुमारे 20 वर्षे टिकला पाहिजे. मात्र काही रस्त्यांना आधीच तडे गेले आहेत. काँग्रेस रोड, केपीटीसीएल रोड आणि कोल्हापूर रोडवर पावसाळ्यात खड्डे पडत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्याने त्यांनी स्मार्टसिटीच्या भोंगळ कारभाराबाबाबत संताप व्यक्त केला.

आंदोलनात केपीसीसी सचिव सुनील हणमन्नवार, बेळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप एमजे, अजीम पटवेगार, श्रीराम सेना जिल्हाध्यक्षा रमाकांत कोंडुसकर, प्रतिभा पाटील, आऐशा सनदी, एन. आर. लातूर, परशुराम दागे, राजन हुलबत्ते, राघवेंद्र लोकारी, रमेश सोनटक्की सरला सातपुते, शुभम शेळके, दिपक जमखंडी, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, संतोष कांबळे, फैय्याज सौदागर, मजहर मुल्ला, राकेश तळवार, विठ्ठल यळळूर, बसवराज शिवार, कुर्शीदा मुल्ला, कस्तुरी कोलकार, कुशाप्पा तळवार यांच्यासह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.