• भारतीय संस्कृती फौंडेशनच्या महिलांचा इशारा
  • जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन  

बेळगाव / प्रतिनिधी  

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थान सध्या विविध समस्यांच्या गर्तेत अडकले असून भाविकांमध्ये याबद्दल नाराजी पसरली आहे. आज भारतीय संस्कृती फौंडेशनच्या  वतीने बेळगावचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

श्री यल्लमा देवस्थानकडून राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो. पण भाविकांच्यासाठी कोणत्याच सोई सुविधा येथे उपलब्ध नाहीत.जोगनभावी येथे महिलांसाठी चेंजिंग रूम उपलब्ध नाही. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सोय उपलब्ध करावी, देवीच्या दर्शनासाठी वेळ लागत असल्यामुळे अनेकजण चक्कर येऊन पडतात. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी. तसेच लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरू करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या सगळ्यांचा विचार करून राज्य सरकारने सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी नगरसेविका सुधा भातखांडे व सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे यांच्यासह सर्व महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.