• खानापूर तालुका म. ए. समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन 

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे विलीनीकरण करू नये,यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले.

कर्नाटक सरकारने काही दिवसांपूर्वी, पंधरा विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या ६४ शाळा, कन्नड माध्यमाच्या५ आणि उर्दू माध्यमाच्या ७ शाळा बंद करून जवळील इतर गावातील शाळांमध्ये त्या विलीन करण्यात येणार आहे. पण इतर तालुक्यातील परिस्थिती आणि खानापूर तालुक्यातील परिस्थिती पाहता.  खानापूर तालुका हा दुर्गम, व मलनाड प्रदेश तथा अरण्य प्रदेश आहे. तेथे वसलेली ही दुर्गम खेडी कमी लोकसंख्या असलेली आहेत. तेथील बहुतांश शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे पण त्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना इतर गावामध्ये शिक्षणासाठी पाठविणे हे जोखमीचे असून, दुर्गम भाग आणि दळणवळणाची सोय नसल्याने जंगली प्राण्यांचा वावर व धोका या भागात असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला वन्य प्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो आणि कदाचित मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा सुद्धा धोका आहे. म्हणून सदर दुर्गम भाग व  आदिवासी भागातील शाळा बंद न करता स्थानिक गाव पातळीवरच सदर विद्यार्थ्यांना सरकारने सर्व गुणसंपन्न शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी तसेच शाळा विलीनीकरण करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हा पालकमंत्र्यांनी  खानापूर तालुक्यायातील दुर्गम भागाची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेऊन योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.

निवेदन देतेवेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजय पाटील, प्रकाश चव्हाण, कृष्णा कुंभार, डी. एम. भोसले, रमेश धबाले, गणेश पाटील  तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.