सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी  सुळगा (हिं.) येथील संस्थेच्या सभागृहात पार पडली.

तत्पूर्वी संचालक कै. कृष्णा पी. पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे चेअरमन अशोक य. पाटील आणि व्हा.चेअरमन बी. एन. बेनके यांनी उपस्थित मान्यवर आणि सभासदांचे स्वागत केले. 


तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे व रमाकांत पावशे यांच्याहस्ते लक्ष्मी प्रतिमा पूजन तर सर्व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 


अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन अशोक य. पाटील हे होते तर तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे हे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. 

याप्रसंगी सोसायटीचे मुख्य व्यवस्थापक एन. वाय. चौगुले यांनी वार्षिक अहवाल, नफा - तोटा पत्रक, ताळेबंद याचे वाचन करताना संस्थेकडे भाग भांडवल - ४०,०२,४४४.००, एकूण ठेवी - ९,९१,५९,७०८.०६, गुंतवणूक  - २,२४,५७,७७७.००, कर्ज व्यवहार -७,६२,२६,५२१.०० तर खेळते भांडवल १०,९९,९५,८९४.०० आणि वार्षिक उलाढाल -२३,८९,११,५४२.७३  झाल्याचे सांगितले. तसेच  गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला ५,८०,५१५.४० रु. एवढा निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली. तसेच याप्रसंगी ८ टक्के एवढा मेंबर डिव्हीडंट (सभासद लाभांश) जाहीर करण्यात आला.

यावेळी प्रमुख वक्ते मनोज पावशे यांनी  संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सभासदांनी सतर्क राहून संस्थेचा कारभार योग्य चालतो की नाही याची शहानिशा करणे हे सभासदांचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले.

तर अध्यक्षीय भाषणात चेअरमन अशोक य. पाटील यांनी संस्थेच्या तिन्ही शाखांचे कामकाज समाधानकारक असल्याचे सांगून  संस्थेमार्फत गेल्या १६ वर्षापासून  विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.

सदर सभेला संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, सल्लागार मंडळ सदस्य, सभासद आणि तिन्ही शाखांचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले .